महत्वाच्या बातम्या

  सिंदेवाही : धान पिकावर रोगराईचे सावट, शेतकरी चिंताग्रस्त


- शेतात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ
- पीक वाचविण्यासाठी महागड्या औषधीची फवारणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : धान पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंदेवाही तालुक्यात कडा करपा, तुडतुडा, यासारख्या रोगराईने धानाच्या पिकाला विळख्यात घेतले असून महागडी औषधाची फवारणी करूनही पिकावरील रोगराही आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हतबल झालेला आहे. तर दुसरीकडे धानाचे पीक कापणीला आले असताना जंगली डुकरांचा कळप शेतात घुसून पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. या दुहेरी पेच प्रसंगात सापडलेला शेतकरी मरणाच्या दरात असताना मात्र शासन कोणतीही मदत जाहीर करीत नसल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.

सिंदेवाही तालुक्यात १०० टक्के धानाचे पीक घेतल्या जाते. यावर्षी वेळेवर पाऊस पडला असल्याने शेतकऱ्यांनी आपली रोवणी वेळेत आटोपून घेतली. यासाठी शेतकऱ्यांनी बँक कडून, कुणी सावकाराकडून, तर कुणी बचत गटाकडून कर्ज घेतले.
पावसाने सुद्धा शेतकऱ्यांना चांगली साथ दिली असल्याने यावर्षी धानाचे पीक जोमात होते. मात्र ऐन वेळेवर रोगराईचे सावट आले. तर दुसरीकडे वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू असल्याने यावर्षी हातात पीक येईल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी, कमी पावसामुळे जमिनीला भेगा, त्यामुळे उत्पादनाची हमी नाही. इंधन दरवाढ झाली असल्याने शेतीच्या मशागतीचा खर्च वाढलेला आहे. 

रासायनिक खताचे भाव गगनाला भिडलेले आहेत, तर कीटकनाशक औषधीचे भाव दुप्पट तिप्पट झाले आहेत. त्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढलेला आहे. आणि उत्पादनात घट झाली तर घेतलेले कर्ज कसे परत करायचे.? याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. कापणीला आलेल्या धानाची तुडतुड्या मुळे तनिस होत आहे. तर लोंबावर आलेल्या धानाला करपा रोगाने घेरले असून हिरवेगार दिसणारे धानापिक आता पिवळसर दिसायला लागले आहे. कधी रोगराईचे संकट, तर कधी वन्यप्राण्यांचा त्रास, यामुळे शेतकरी बेजार झाले आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos